राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोकणातील तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणीस यांनी वादळग्रस्तांना तातडीने भरघोस नुकसानभरपाई देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, फडणवीसांच्या या दौऱ्यावरून राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. “फडणवीसांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात करोनासाठी त्यांची आवश्यकता नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर देखील निशाणा साधला.

“देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत!”

सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी यावेळी केली. “देवेंद्र फडणवीस सातत्याने अस्वस्थ आहेत. सरकार घालवण्यासाठी दीड वर्षात अनेक प्रयत्न करूनही ते शांत बसलेले नाहीत. करोना काळात ते चक्रीवादळाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये शेकडो मृतदेह गंगा नदीकिनारी पुरले गेले. गुजरातमध्ये ७१ हजार मृत्यू लपवले गेले. गोव्यात ४ दिवस सलग ऑक्सिजन अभावी ९० लोकांचे मृत्यू झाले. या तिनही राज्यांमध्ये झालेली मृत्यूची लपवालपवी आणि करोनाचा प्रादुर्भाव यावर उपाययोजना करण्यासाठी हा दौरा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून निवड करावी आणि त्यांना तिकडे पाठवावं. महाराष्ट्रात करोनाची संख्या कमी होत असून आमच्या राज्यात करोनासाठी त्यांची आवश्यकता नाही”, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

“अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे”

दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर देखील हसन मुश्रीफ यांनी तोफ डागली. “तौते चक्रीवादळापूर्वी ८ दिवस हवामान विभागाने इशारा दिला होता. असं असताना बॉम्बे हायमध्ये अफकॉन कंपनीने काम करत राहून शेकडो जीव धोक्यात घालण्याचा प्रकार केला. नवाब मलिक यांनी ONGC विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका केली. अतुल भतखळकरांना लाज वाटली पाहिजे. इतके लोक मृत्यूमुखी पडले असताना ते या कंपनीचे एजंट आहेत की वकील आहेत ज्यामुळे नवाब मलिकांवर टीका करत आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्ता गेलेल्या अस्वस्थ लोकांचंच मानसिक संतुलन बिघडलं आहे”, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी अतुल भातखळकरांना सुनावलं आहे.

‘नवाब मलिकांना काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’; भाजपा आमदाराची टीका

“संभाजीराजेंचा असा अवतार मी पाहिला नाही!”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवारी संभाजीराजे भोसले यांनी जाहीरपणे आणि कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यावर देखील मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. “संभाजीराजेंसारख्या संयमी व्यक्तीचा असा अवतार मी पाहिलेला नाही. चार वेळा पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटायला वेळ देत नाहीत. याबद्दल त्यांचा संताप आहे. सत्तारूढ लोक मराठा आरक्षणाला दिलासा देत नाहीत अशी त्यांची मागणी आहे. पण संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच हा लढा यशस्वी होईल. मराठा आरक्षणासाठी जे काही प्रयत्न करता येतील, ते आम्ही करू आणि संभाजीराजांचं समाधान करू”, असं मुश्रीफ यांनी नमूद केलं.

Story img Loader