मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेवर भररस्त्यात चाकुने वार करून खून करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर हल्लेखोराने महिलेचा मृतदेह ओढत फुटपाथवर नेला. ही घटना अंधेरीची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत महिला एका कारमधून उतरली होती. ती कारमधून खाली उतरताच हल्लेखोराने पाठिमागून तिच्यावर चाकुने निर्दयी वार केले. या हल्ल्यात संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळली. यानंतर हल्लेखोराने तिचे पाय पकडून त्याला ओढत रस्त्याच्या बाजुला नेलं. हल्लेखोराने काळ्या रंगाचा कोट-पँट आणि टोपी घातल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडल्याचं समजत आहे.
हेही वाचा- रक्ताच्या नात्याला फासला कलंक, पुण्यात जन्मदात्या आईनं अल्पवयीन मुलीचं प्रियकराशी लावलं लग्न
हल्लेखोराने नेमक्या कोणत्या कारणातून महिलेची हत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनाक्रमानंतर ट्विटरवर ‘#HatmanKillerInMumbai’ असा हॅशटॅग सुरू झाला आहे. हॅटमॅनपासून सावध राहण्याचा सल्लाही सोशल मीडियात देण्यात येत आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. “आम्हाला अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळाली नाही” असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तूर्तास पोलिसांनी हत्येचं हे प्रकरण फेटाळून लावलं आहे.