गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अजित पवार काही दिवस नॉट रिचेबलही होते. त्यामुळे सत्तांतर घडण्याच्या चर्चा आणखी गडद झाल्या होत्या. पण यानंतर अजित पवार यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबर राहणार आहे, असं अजित पवारांनी जाहीर केलं.
यानंतर अजित पवारांनी एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. सत्तांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर मिश्किल विधान केलं.
अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबद्दल विचारलं असता रवींद्र धंगेकर हसत म्हणाले, “मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय.” सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवींद्र धंगेकर यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी करमाळा येथील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीवर भाष्य केलं. स्थानिक नेत्यांचा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.