राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी केवळ साळगावकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहून दिलेली तक्रार स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
भाजपा नेते रवींद्र साळगावकर यांच्या तक्रारीवर आता अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. होय, माझ्याकडून त्यांना धोका असू शकतो. पण तो राजकीय धोका असू शकतो. पण शारीरिक धोका असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- ‘त्या’ विधानांवरून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसह फडणवीसांना सुनावलं, म्हणाले…
रवींद्र साळगावकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले, “कुणामुळेही कुणाच्या जिवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्याने तक्रार केली आहे, त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण द्यावं.”
हेही वाचा- “अजित पवारांकडून माझ्या जिवाला धोका”, पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार
‘तुमच्याकडूनच संबंधित व्यक्तीला धोका आहे’ याबाबत विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “तुम्ही पत्रकार मित्र मला इतके वर्षे ओळखता. तरी तुम्हाला वाटतं का, की माझ्यामुळे कुणाला धोका असू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था, संविधान पाळणारा मी माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडून धोका असण्याचं काहीच कारण नाही. माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो. पण कुणालाही शारीरिक धोका असू शकत नाही.”
तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
रवींद्र साळगावकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, शिवाजी नगरमधील गणेश खिंड रस्त्यावर एक भूखंड आहे. या भूखंडाची मोजणी करण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणला आहे. मुळात ही मोजणी करता येत नाही. यासंबंधीची फाईल सरकारी कार्यालयात आहे. त्यावर अजित पवारांचं नावही आहे. मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहे. तसेच या प्रकरणाला मी विरोध करत आहे, त्यामुळे अजित पवारांकडून माझ्या जिवाला धोका आहे. रवींद्र साळगावकर यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.