आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच, महायुती आणि महाआघाडीने जागावाटपासंदर्भातील वाद सोडवण्याकरता बैठकांनाही जोर दिला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतील राज्यातील सर्व जिल्ह्यांत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानुसार, सांगली जिल्ह्यातही आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महायुतीवर टीका केली आहे.
“आम्हाला काही दिलं नाहीतरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी मुंबईत बैठकीला गेलो होतो. आम्हाला म्हणाले कामाला लागा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा. मग मी विचारलं, तुम्ही आम्हाला काय समजलंय? आम्हाला बँडवाले समजलात का? लग्नाचा सिजन आला ताशा कुठे आहे पाहा, पिपाणी कुठे आहे बघा. म्हणजे आम्हाला वाजवायला ठेवलंय का?”, असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.
आमच्याकडे बघून हसू नका
“तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत. त्यामुळे मोदी आणि फडणवीसांसाठी आम्ही लढणार आहोत. म्हणून घटकपक्षांनाही सन्मान द्या. कोण आलं की काही जण बघून हसतात. पण बघून हसू नका. मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
आमची उपेक्षा करू नका
“आम्ही चळवळीतले नेते आहोत. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर आमची आठवण आली. सत्तेच्या काळात घटकपक्षांना उचित सन्मान दिला नाही. निधीही दिला नाही. सर्व घटकपक्षांना तुम्ही बोलवायला हवं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही खुरपी घेऊन आलोय. तण काढतोय, पण आमची उपेक्षा करू नका”, असंही खोत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांत आज महायुतीचा समन्वय मेळावा झाला. या मेळाव्यात महायुतीचे सर्व घटकपक्ष उपस्थित होते. या मेळाव्याची जबाबादारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात आली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ चा आकडा गाठण्यासाठी महायुतीने जय्यत तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.