पाकिस्तानात एका एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील कराचीहून रावळपिंडीकडे जाणाऱ्या ‘हजारा एक्स्प्रेस’ रेल्वेला हा अपघात घडला. हजारा एक्स्प्रेस रेल्वेचे दहा डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. याबाबतचं वृत्त ‘जिओ टीव्ही’ने दिलं आहे.
शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्टेशनजवळ रविवारी हा अपघात झाला. हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीकडे निघाली होती. या रेल्वेचे दहा डबे रेल्वे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला. घटनास्थळी अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे.
या घटनेची अधिक माहिती देताना पाकिस्तान रेल्वेचे उप अधीक्षक मोहम्मद रेहमान म्हणाले, “सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. रुळावरून घसरलेल्या डब्यांमधून लोकांना बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.” या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
संबंधित व्हिडीओत स्थानिक नागरिकांसह बचाव कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी रूळावरून घसरलेल्या डब्यांमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जखमी लोकांना नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.