राज्यसभेच्या  पाठोपाठ लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर राळेगणसिद्घीमध्ये बुधवारी दिवाळी साजरी करण्यात आली. विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर हजारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी राळेगणसिद्घीच्या शालेय विद्यार्थ्यांकडून नारळ पाणी घेऊन हजारे यांनी आपले गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.  देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ६६ वर्ष लोटल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालणारा सक्षम कायदा प्रथमच तयार होत असल्याचे  सांगतानाच लोकपाल विधेयकाचे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कायदयात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी राळेगणसिद्घीत बोलताना व्यक्त केली.
लोकपाल विधेयकावर लोकसभेत सुरू असलेली चर्चा हजारे यांच्यासह आयपीएस अधिकारी किरण बेदी, व्ही. के. सिंग, विश्वंभर चौधरी, हे व्यासपीठावर दूरचित्रवाणीवर पाहत होते. राळेगणसिद्घी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी साहिल सुरेंद्र गायकवाड व प्रीती दत्तात्रय उगले यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन ९ दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
 यावेळी अण्णा म्हणाले, लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झाले ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल निवड समितीस आपण धन्यवाद देतो. यापूर्वी लोकसभेत सादर करण्यात आलेले विधेयक कमकुवत होते. या विधेयकास लोकसभेतील मंजुरीनंतर राज्यसभेत विधेयक गेल्यानंतर निवड समितीची स्थापना झाली. या समितीने विधेयकात जनतेला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांचा समावेश केला. त्यानंतर राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले. समाजवादी पक्ष सोडून सर्व सदस्यांना धन्यवाद देत असल्याचे हजारे यांनी जाहीर केले.
 हजारे पुढे म्हणाले की,  ‘स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालणारा सक्षम कायदा प्रथमच तयार होत आहे. या कायदयामुळे  भ्रष्टाचार शंभर टक्के थांबणार नाही तर किमान पन्नास टक्के भ्रष्टाचारास आळा बसेल. लोकसभेची अचारसंहिता लागू होण्यापूर्वी या विधेयकाचे कायदयात रूपांतर झाले पाहिजे, जनतेच्या वतीने तशी आपली सरकारला विनंती असून दीड- दोन महिन्यात कायदा अस्तित्वात आल्यास या कायद्यात कशाचा अंतर्भाव करण्यात आला आहे हे कायद्याचा मसुदा हाती पडल्यानंतर छोटया मोठया गोष्टी पाहिल्यावर जनतेला समजू शकेल.’

Story img Loader