ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी सकाळीच राळेगणसिद्धी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. हजारे यांचा राजकीय पक्षांना विरोध असला तरी त्यांच्या निकटच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र मतदानाच्या दिवशी उघडपणे विविध राजकीय पक्षांचा झेंडा खांद्यावर घेतला.
राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी हे पूर्वीपासूनच राजकारणात सक्रिय असून ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत. मापारी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्यासाठी प्रचारयंत्रणा राबविली. दिवसभर ते मतदान केंद्रावर होते. माजी सरपंच गणपतराव औटी यांचे चिरंजीव लाभेश औटी आम आदमी पार्टीच्या संपर्कात होते. पारनेरमध्ये पक्षाचे कार्यालय सुरू करण्यासाठीही त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्घ झाल्यानंतर लाभेश यांनी आपला इरादा बदलून आपला निर्णय लांबणीवर टाकला. गुरुवारी मात्र त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार दीपाली सय्यद यांच्यासाठी मते मागून आम आदमी पक्षाशी आपली नाळ जोडली गेलेली असल्याचे दाखवून दिले.
हजारे यांचे पूर्वीचे स्वीय सहायक सुरेश पठारे हे हजारे यांच्यापासून दूर गेल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या प्रचारात जाहीरपणे सहभागी झाले नसले तरी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे आजही सख्य आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका संदिग्ध राहिली. लोकसभेच्या या निवडणुकीत मात्र पठारे सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारात सक्रिय होते. गुरुवारी येथील मतदान केंद्रावर हजेरी लावून पठारे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. व्हॉट्स अ‍ॅपवरूनही त्यांनी तसे संदेश पाठविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा