आपणासोबत काढलेल्या छायाचित्रांचा कोणी राजकीय कारणांसाठी वापर करीत असेल तर आपण संबंधित उमेदवारांना जाब विचारू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांनी दोनदा, तर भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी एकदा राळेगणसिद्घी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली होती. त्या वेळी दोघांनीही हजारे यांच्यासमवेत काढलेली छायाचित्रे वर्तमानपत्रांत प्रसिद्घ केली होती. त्यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम आसावा यांनी नुकतेच प्रसिद्घिपत्रकाद्वारे भाजप उमेदवार गांधी यांच्यावर हजारे यांची भेट घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. निवडणुका जवळ आल्यावरच त्यांना अण्णांची आठवण येते. एरवी हे लोक अण्णांच्या देशहिताच्या आंदोलनात सहभागी होत नाहीत. नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचाराशी गांधी यांचा संबंध असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी थेट हजारे यांनाच त्याविषयी विचारले. हजारे यांना आसावा यांच्या त्या पत्रकाची कल्पना नव्हती.
दिल्लीतील निवडणुकीत माझ्या फोटोचा अथवा नावाचा वापर करू नका असे पत्रक काढलेले असताना या निवडणुकीत मात्र नगर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार अण्णांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, फोटो अथवा नाव वापरू नका. तुम्ही तुमच्या हिमतीवर लढा असे मी त्यांना सांगितले आहे. तरीही परवानगीशिवाय त्यांनी तसे केले असेल तर त्यांना मी जाब विचारीन. तुम्ही माझ्या फोटोचा व नावाचा वापर करीत आहात याचा अर्थ तुमच्यात पात्रता नाही असाच होतो, असे सांगतानाच राजकीय स्वार्थासाठी राळेगणसिद्धीस येणे योग्य नाही असेही हजारे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा