HCL Employee : अ‍ॅना सबेस्टियन या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. HCL या कंपनीत काम करणाऱ्या ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू कंपनीच्या स्वच्छतागृहात झाला आहे. नितीन एडविन मायकल हे सिनीयर अ‍ॅनालिस्ट म्हणून कंपनीत काम करत होते. कंपनीच्या स्वच्छतागृहात ते गेले त्यानंतर ते स्वच्छतागृहात पडले. ते काहीही हालचाल न करता पडले आहेत हे पाहून त्यांना तातडीने नागपूरच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?

नितीन मायकल एडविन मायकल यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं जेव्हा त्यांचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टने झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणाती अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन यांच्यामागे त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे. या प्रकरणी HCL या कंपनीने दुःख व्यक्त केलं आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- HDFC Bank Employee Death : HDFC बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू, सहकाऱ्यांचा आरोप

कंपनीने घटनेबाबत व्यक्त केला शोक

कंपनीने या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नितीन यांच्या मृत्यूमुळे कंपनीचीही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नितीन यांना जेव्हा त्रास झाला तेव्हा आम्ही तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

आमच्या कंपनीतल्या लोकांचं आरोग्य चांगलं आहे ना? यासाठी आम्ही कायमच आरोग्य तपासणीचे कार्यक्रम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राबवत असतो. कंपनीच्या परिसरात हे कार्यक्रम होतात. वार्षिक चाचण्याही केल्या जातात असंही कंपनीने म्हटलं आहे. तसंच आम्ही नितीन यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचंही स्पष्ट केलं आहे. अॅना सबेस्टियनच्या मृत्यूनंतर गेल्या काही दिवसांत अशा घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा कंपनीतील अतिकामामुळे अतिताण येऊन मृत्यू झाला आहे. नितीन मायकल एडविन यांच्याबाबत अद्याप असा कुठलाही आरोप समोर आलेला नाही. शुक्रवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कर्मचाऱ्यांना कामाचा ताण येऊ नये म्हणून विविध कंपन्या विविध कार्यक्रम, आरोग्य शिबीरंही आयोजित करत असतात.