बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत जात आहे. नणंद-भावजयीमधील या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर, अजित पवारांनीही यात आता उडी मारली असून सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. आजच्या बारामती येथील सभेतही त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे.
– IPL2 Quiz
“गावकी-भावकीची ही निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या १३५ कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सासू-सुनेची, नणंद भावजयीची निवडणूक नाही. ही भावकीची निवडणूक नाही ही मोदी साहेब आणि राहुल गांधींची निवडणूक आहे, असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेच गेलंय. बारामतीतील सर्व स्थित्यंतराचे बारामतीतील वडिलधारी लोक साक्षीदार आहेत.”
लोकांना भावनिक केलं जातंय
“लोकांना भावनिक केलं जातं. कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सचा पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी शरद पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलं की बघा कुटुंब कसं एक आहे. पण मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा साहेब एकेठिकाणी बसले असतील तर मी दुसरीकडे बसायचो”, असं अजित पवार म्हणाले.
बारामतीसाठी मी काहीच नाही केलं?
ते पुढे म्हणाले, ती (रोहित पवारांसह इतर भावकीतील मुलं) माझीही मुलं आहेत. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाला. आणि काल तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. केलं मग? ३१-३२ वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणी आणला? जाचकबंधूंनी आणला. माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर, जाधवरावांनी आणला. सोमेश्वर कारखाना मुकुटराव आप्पांनी आणला. हे सर्व जगजाहीर आहे. खरेदी विक्री संघ पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला. त्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती. मार्केट कमिटी कधीची आहे, फार पूर्वीपासूनची आहे. नगरपालिका १८६५ मधली आहे. तुमचा आमचाही जन्म झाला नव्हता. पण ते म्हणतात संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय?”, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.