नीलेश पवार, नंदुरबार
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेली नंदुरबार जिल्ह्य़ातील व्यक्ती महाराष्ट्रातील नंबर एकचा मतदार झाला आहे. राजेश भाना तडवी असे या मतदाराचे नाव असून ते महाराष्ट्र शासनाच्या तरंगत्या दवाखान्यात बोट चालविण्याचे काम करतात. हा पहिल्या क्रमांकाचा मतदार कुटुंबासह गुजरातमधील मूळ गावी वास्तव्यास आहे.
राज्यातील अक्कलकुवा हा प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ आहे. त्यातील मणिबेली हे गाव पहिल्या विभागात येत असल्याने या गावातील मतदार हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार असतो.
मुळात या पहिल्या क्रमांकाच्या गावात महाराष्ट्रातून रस्ता जात नसल्याने आजही गुजरातमार्गे प्रवास करून नर्मदेवरील सरदार सरोवरातून बोटीने जावे लागते. विधानसभा निवडणुकीसाठी प्रथम क्रमांकाचे मतदार राजेश तडवी हे मूळचे गुजरातमधील बभाना गावचे रहिवासी असून चार वर्षांपूर्वी मणिबेली सोडल्यापासून ते बभानामध्येच राहतात.
मणिबेलीसारख्या अतिदुर्गम भागांकडे प्रशासनाचे सातत्याचे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारातून अधोरेखित होते. शासकीय यंत्रणा प्रत्यक्षात या भागात न जाता कागदी घोडे नाचवून काम करते. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे संघटना आणि वारंवारची आंदोलने जी वस्तुस्थिती मांडत आहेत, त्याकडे आता तरी प्रशासनाने डोळे उघडे ठेवून बघावे आणि काम करावे.
– लतिका राजपूत
(सामाजिक कार्यकर्त्यां, नर्मदा बचाव आंदोलन)