मागील काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. या राजकीय घडामोडी घडत असताना बंडखोर आमदार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. संजय राऊत अनेक बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहे. दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत हे देव आहेत. त्यांचं नाव माझ्यासमोर घेऊन माझं तोंड खराब करायला लावू नका, असं ते म्हणाले आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे शिवसेना पक्षाचं काय होईल? आणि धनुष्यबाण गोठावलं जाईल का? असे प्रश्न विचारले असता, उदयनराजे म्हणाले, एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं ‘धनुष्यबाण’ गोठावलं जाणार नाही, असं मला वाटतं. एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे असून ते आमदारही नव्हते, तेव्हापासून आमची मैत्री आहे. ते एक चांगले व्यक्ती असून मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतील, असा आत्मविश्वास मला आहे, असंही उदयनराजे म्हणाले.
हेही वाचा- मूळ शिवसेना कोणती, हे कसे ठरणार?
“मूळ शिवसेना आम्हीच आहोत” या संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता, उदयनराजे भोसले प्रसारमाध्यमांसमोर हात जोडत म्हणाले, “संजय राऊत हे देव आहेत. त्यांचं नाव माझ्यासमोर घेऊन माझं तोंड खराब करू नका.” राऊतांबाबत अन्य एक प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.
हेही वाचा- ‘त्या’ १२ खासदारांसंह एकनाथ शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद; भावना गवळी, राहुल शेवाळेही उपस्थित
खरंतर, शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याबाबतचं एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. संबंधित पत्रात शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांचा उल्लेख गटनेते म्हणून करण्यात आला आहे, तर खासदार भावना गवळी यांच्याकडे मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर आता संबंधित पत्रावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय निर्णय घेणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.