Nitesh Rane on Munawar Faruqui: स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा सध्या चर्चेत आहे. मुंबईतील एका स्टॅन्ड अप कॉमेडी शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधत असताना कोकणी माणसाबद्दल त्याने अपशब्द उच्चारले होते. मनसेकडून त्याच्या कॉमेडी शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर फारुकीच्या विरोधात नाराजी पसरली. मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाचा फारुकीने अवमान केला असल्याची ओरड झाल्यानंतर मुनव्वर फारुकीने पुन्हा एक व्हिडीओ तयार करत माफी मागितली. पण आता माफीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला असून त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीला इशारा दिला. ते म्हणाले, “मुनव्वर फारुकीची गुन्हा करण्याची सवयच आहे. ‘लातों के भूत, बातों से नही मानते’, या म्हणीप्रमाणे त्याला धडा शिकवावा लागेल. हिंदू समाज, प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल त्याने चुकीचे काही म्हटले होते, त्यानंतर माफी मागितली. आता कोकणी माणसाचा अपमान केला, त्यानंतर पुन्हा माफी मागितली. आता आम्हीही त्याच्या कानशिलात लगावतो आणि नंतर माफी मागतो.”
आमचा हिंदू समाज, कोकणी माणूस, धर्म हा मस्करीचा विषय नाही. कुणीही त्यावर थट्टा-मस्करी करू नये. नाहीतर आम्हीही कानशिलात लगावून तुमची माफी मागू, असेही नितेश राणे म्हणाले. तत्पूर्वी नितेश राणे यांनी १२ ऑगस्ट रोजी मुनव्वर फारुकीच्या माफीनाम्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यातही त्याला इशारा दिला गेला होता.
मुनव्वर फारुकी कोण आहे?
मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) हा एक कॉमेडियन व रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सिझनच्या विजेतेपदावर नाव कोरले होते. तेव्हापासून लोकप्रिय झाला. त्याच्या जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.