रवींद्र जुनारकर

चंद्रपूर

राज्यातील एकमेव खासदार निवडून देणाऱ्या चंद्रपूर जिल्हय़ात काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास बळावला असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी गटबाजीचे ग्रहण हा पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. वंचित आघाडीने भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंतुष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्हय़ात विधानसभेचे चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी असे एकूण सहा मतदारसंघ आहेत. यातील चार ठिकाणी भाजप आणि प्रत्येकी एकेक जागा काँग्रेस व शिवसेनेकडे आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळू धानोरकर काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून आले. या जिल्हय़ात २५ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर सर्वत्र भाजपची सत्ता आहे. असे असतानाही या वेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा ४५ हजार मतांनी पराभव करीत युतीला पराभवाची धूळ चारली. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम कधी नव्हे ते भाजपमध्ये मुनगंटीवार विरुद्ध अहीर असे उघड गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर व वरोरा या चार विधानसभा मतदारसंघांत निर्णायक मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व खासदार धानोरकर उत्साहात आहेत.

बल्लारपूर क्षेत्रातून धानोरकर यांना मिळालेल्या ३१ हजारांवर मताधिक्यामुळेच येथे ओबीसी चेहऱ्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आग्रह होत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सलग २५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. येथे मुनगंटीवार-अहीर यांच्या पुण्याईवर नागपुरचे नाना शामकुळे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र लोकसभेत चंद्रपूर क्षेत्रातून काँग्रेसला मिळालेली २५ हजार मतांची आघाडी बघता भाजपला किंबहुना शामकुळे यांना ही निवडणूक यंदा कठीण आहे. विशेष म्हणजे शामकुळे यांच्याऐवजी नवा चेहरा द्या, अशी मागणी भाजपचेच पदाधिकारी करीत आहेत. येथे काँग्रेस पक्षाकडेही उमेदवार नाही. बौद्ध समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे काही इच्छुक नेते करीत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून ५० हजारांवर मते घेतली होती. विशेष म्हणजे, जोरगेवार काँग्रेस व भाजप अशा दोन्ही नेत्यांच्या संपर्कात आहे. नुकतीच त्यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची चंद्रपुरात भेट घेतली होती. राजुरा क्षेत्रात भाजपचे विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अ‍ॅड. धोटे यांना घरी बसवून नवा चेहरा द्यावा, अशी मागणी भाजप नेतेच करीत आहेत. येथून भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी कामही सुरू केले आहे. या क्षेत्रात लोकसभेत काँग्रेसने ३६ हजार मतांची आघाडी घेतली असली तरी तेथील काँग्रेसचा चेहरा माजी आमदार सुभाष धोटे यांच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा ठपका बसला आहे. धोटेबंधूंना या प्रकरणात अटकही झाली होती. काँग्रेसने त्यांना तिथून उमेदवारी दिली तर संपूर्ण आदिवासी समाज पक्षाच्या विरोधात जाण्याची भीती आहे. अशा वेळी काँग्रेसला अतिशय सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, तिथून काँग्रेसची उमेदवारी मागणाऱ्या सर्वच इच्छुकांनी उमेदवारी कुणालाही द्या, धोटे यांना देऊ नये, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे मुलाखत कार्यक्रमाच्या दरम्यान केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदर्शन निमकर यांनीही येथून दावा केला आहे.

वरोरा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा आहे. २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेकडून ते अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसने येथून १२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. येथून खासदार धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मागितली आहे, तर माजी मंत्री स्व. दादासाहेब देवतळे यांचे सुपुत्र डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे, दिनेश चोखारे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. धानोरकर यांचे बंधू भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी शिवसेनेकडून, तर माजी मंत्री संजय देवतळे यांनी भाजपची उमेदवारी मागितली आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. अशा स्थितीत जागांची अदलाबदल होते का याची उत्सुकता आहे. चिमूर क्षेत्रात भाजपचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचेच धनराज मुंगले दंड थोपटून उभे आहेत. काँग्रेसकडे माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूकर व शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले गजानन बुटके या दोघांनी उमेदवारी मागितली आहे.

वडेट्टीवार यांना पक्षातूनच आव्हान

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी क्षेत्रातून ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उमेदवारी मागितल्याने काँग्रेस पक्षातील गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येण्याची शक्यता आहे. ही आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटची लढाई आहे, असे पुगलिया सांगत असल्याने वडेट्टीवार यांना प्रथम घरातील लढाई जिंकावी लागणार आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. भाजपकडे वडेट्टीवार यांना सर्वशक्तिनिशी लढत देऊ शकेल असा उमेदवार नाही. माजी आमदार प्रा. अतुल देशकर व गडचिरोली जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचेही नाव चर्चेत आहे, तर भाजपच्या उमेदवारीसाठी गड्डमवार मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्वच नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या वेळी वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीत चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली असली तरी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला उमेदवार शोधावे लागणार आहेत. सध्या तरी वंचितचे लक्ष भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख पक्षांतील असंतुष्ट उमेदवारांवरच आहे. बसपा, रिपाइं, मनसे व इतर छोटय़ा पक्षांचे अस्तित्व येथे नगण्य आहे.

राजकीय चित्र

* चंद्रपूर – भाजप

* बल्लारपूर – भाजप

* राजुरा – भाजप

* वरोरा – शिवसेना

* चिमूर – भाजप

* ब्रह्मपुरी – काँग्रेस

Story img Loader