-संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई गेल्या काही वर्षात प्रामुख्याने करोना काळात महाराष्ट्रासह देशभरात मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात लहान मुलांपासून ते वृद्धलोकांपर्यंत मानसिक आजाराच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन प्रभावी उपापयोजना करण्याची शिफारस केली आहे. खास करून करोनाच्या काळात वेगवेग‌ळ्या कारणांनी मानसिक आजाराचे रुग्ण वाढू लागल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने ‘टेलीमानस’ नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने विकसित केलेले ई-मानस सॉफ्टवेअर राज्यासाठी घेण्याचे निश्चित केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या जिल्हा मानसिक कार्यक्रमातील आकडेवारी गेल्या काही वर्षात मानसिक आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दाखविणारा आहे. खासकरून करोनाकाळात मानसिक आजाराच्या वेगवेगळ्या समस्यांनी वेगवेगळ्या वयोगटातील रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात लहान मुलांचा तसेच महिला व वृद्धांचा समावेश लक्षणीय असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा मानसिक कार्यक्रमांतर्गत २०१९-२० मध्ये बाह्य रुग्ण विभागात दोन लाख ८४ हजार ७६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर २०२०-२१ मध्ये तीन लाख ४७ हजार ४८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २०२१-२२ मध्ये तीन लाख २८ हजार ७७६ रुग्णांची तपासणी बाह्यरुग्ण विभागात करण्यात आली.

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्येही करोनाकाळात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या माध्यमातून समुपदेशनाचे काम करण्यात आले. आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार करोना काळात वाढलेली बेरोजगारी व त्यातून घराघरात निर्माण झालेले ताणतणाव तसेच लहान मुलांमधील व्यसनाधीनता आणि वृद्ध लोकांच्या आरोग्य समस्यांवर कमी प्रमाणात झालेल्या उपचारामधून ताणतणाव, चिंतारोग, व्यसनाधीनता. स्किझोफ्रेनिया, निद्रानाश व झोपेशी संबंधित विकार, बायपोलर ऑफिसिव्ह डिसऑर्डर आदींच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ‘टेलीमानस’ सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले. ही जवळपास पावणेतीन कोटी रुपये खर्चाची योजना असून यात पुणे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच अंबेजोगाई रुग्णालय अशा तीन केंद्रांमधून एका विशिष्ठ दूरध्वनी क्रमांकावर रुग्णाला मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन व सल्ला दिला जाणार आहे. यासाठीचा विशिष्ठ दूरध्वनी क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगून डॉ. लाळे म्हणाले की, मानसोपचारतज्ज्ञांपासून मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही योजना कार्यरत होणार असून यात रुग्णाला त्याचे नाव संगणे बंधनकारक असणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने मानसिक आजाराच्या रुग्णांसाठी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ई-मानस हे या सॉफ्टवेअरचे नाव असून यात रुग्णाची सर्वप्रकारची माहिती संकलित करण्यात येत असल्याने रुग्णावरील उपचारात त्याचा उपयोग होतो. हे ई-मानस सॉफ्टवेअर कर्नाटक सरकारकडून घेण्याचा आरोग्य विभागाचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचप्रमाणे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक ताणतणाव विषयक मार्गदर्शन देण्याच्या उद्देशान ‘मनशक्ती क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत.

राज्यातील १८१४ प्राथिमक आरोग्य केंद्रांपैकी जानेवारी २०२२ पर्यंत ५८० ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार बहुतेक ठिकाणी ही केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तर ३६३ उपजिल्हा रुग्णालयातही ही केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. खासकरून करोना काळात आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ताफतणावापासून मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य विभागाने तज्ज्ञाच्या मदतीने २९ वेबेनार सिरीज घेतली होती व याचा लाभ नऊ लाख ३५ हजार ९२६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे मानसिक आरोग्य कक्षच्या डॉक्टरांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर टेलीमान योजना मानसिक आजाराच्या लाखो रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास डॉ स्वप्नील लाळे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health department introduced telemanas scheme for mental illness msr
Show comments