संदीप आचार्य
राज्याच्या ग्रामीण भागात साथरोग आजाराने उचल खाल्ली असून हिवताप, डेंग्यू, तसेच स्वाईन फ्लूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. अनेक दुर्गम व आदिवासी भागातील गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटून आरोग्य व्यवस्था पोहोचू शकत नाही हे लक्षात घेऊन यंदा योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांच्या आरोग्य तपासणीबरोबरच गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
पावसाळी व साथरोग आजारांचा विचार करून आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून सर्व जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहोत. या पार्श्वभूमीवर हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुन्या, तसेच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. यंदा जून २८ पर्यंत हिवतापाचे ४,०७९ रुग्ण आढळून आले असून यापैकी गडचिरोलीत १,६३३ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय चंद्रपूर, गोंदिया, ठाणे व सिंधुदुर्ग येथे हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. २०२१ मध्ये आरोग्य विभागाने हिवतापाच्या १९,३०३ रुग्णांची नोंद केली होती तर २०२२ मध्ये १५,४५१ रुग्ण नोंविण्यात आले होते. डेंग्यूचे २०२१ मध्ये १२,७२२ रुग्ण सापडले व ४२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये ८,५७८ जणांना डेंग्यू झाला तर २७ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा २८ जूनपर्यंत १९७६ जणांना डेंग्यूची लागण झाली असून पालघरमध्ये ६२६ रुग्ण आढळून आले आहेत. तर कोल्हापूर ११६, नांदेड ८४ आणि रत्नागिरी येथे ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
चिकनगुन्याचे यंदा २७० रुग्ण आढळून आले असून यात वाढ होण्याची भिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी चिकनगुन्याचे १०८७ रुग्ण आढळून आले होते. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या ३७१४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर यंदा जूनअखेरीस ६८६ स्वाईन फ्लू रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात लेप्टोस्पायरोसीसच्या रुग्णांमध्ये यंदा वाढ दिसत असून जून अखेरीस ४१३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यात ४५८ लेप्टोस्पायरोसीसच्या रुग्णांची नोंद होती तर १८ जण या आजारात मृत्यू पावले होते.
हिवतापामध्ये प्लाझमोडियम फॅल्सीपेरम हा अत्यंत घातक असून यामुळे मेंदूचा हिवताप होऊन रुग्ण दगावू शकतो. यामुळे केंद्राच्या मार्गदर्शन तत्वांच्या अधिन राहून राज्यात हिवताप निर्मूलनासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतात, असे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. यात नवीन हिवताप रुग्ण शोधण्यासाठी पाडे, वाड्या, वस्ती व गावपातळीवर व्यपक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाचे तात्काळ निदान व्हावे यासाठी रॅपिड डायग्नोस्टिक किटचा पुरवठा केला जातो. आशांना प्रशिक्षित करण्याबरोबर राज्यात हिवताप निदानासाठी ६९ सेंटीनल सेंटर स्थापन करण्यात आल्याचे डॉ आंबेडकर म्हणाले.
कीटकनाशक फवारणी, आळीनाशक फवारणी, कीटकनाशक भारित मच्छरदाणी वाटप केले जाते. तसेच दरवर्षी जून व जुलै महिन्यात हिवताप- डेंग्यू प्रतिरोध उपक्रम राबवले जात असल्याचेही डॉ आंबेडकर यांनी सांगितले. गेल्या वर्षी फॅल्सीपेरम मलेरियाचे ८९८३ रुग्ण आढळले होते. यंदा जून अखेरीस १८१० रुग्ण आढळले असून ज्या ठिकाणी याचे जास्त प्रमाण आहे अशा गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर, ठाणे व सिंधुदुर्ग या ठिकाणी विशष लक्ष देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान पावसाळ्यात उद््भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जोखीमग्रस्त गावे ओळखून त्याप्रमाणे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र तपासून पाहावेत, पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्यावत ठेवावी व राज्य स्तरावरही पाठवावी, साथरोग नियंत्रणासाठीच्या किटचे वाटप करावे व त्याचा अद्यावत अहवाल तयार ठेवावा, आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे ठेवाव्यात तसेच डास उत्पत्ती ठिकाणांवरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे, शीघ्रकृती पथकाद्वारे तयार करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक बुकलेट तयार करण्यात यावे व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा आद्यवत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथ रोगाबाबतची माहिती लावण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलक लावावे, अशा सूचना यावेळी डॉ. तानाजी सावंत यांनी केल्या. अतिरिक्त मुख्य सचिव यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे त्यांनी सूचित केले.