आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे पुढील ६० दिवसात त्वरित भरली जातील, अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत सोहळा शनिवारी विद्यापीठाच्या मुख्यालयातील शिक्षक प्रबोधिनीमध्ये झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ही माहिती दिली.
दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांच्या एकूण सहा हजार ७१० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विविध विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त केलेल्या ४७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आव्हाड तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. विश्वमोहन कटोच आणि मध्यप्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. पी. लोकवानी, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर उपस्थित होते.
अलीकडच्या काळात समाजातील सुसंवाद कमी होत आहे. विशेषत्वाने डॉक्टर्स व रुग्ण यांच्यातील संवाद अधिक चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.
दीक्षांत भाषण करताना डॉ. विश्व मोहन कटोच यांनी चांगले डॉक्टर्स होण्याबरोबर आपल्यातील संशोधनवृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.
‘आरोग्य विभागातील रिक्त पदे ६० दिवसात भरणार’
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे पुढील ६० दिवसात त्वरित भरली जातील, अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती...
First published on: 01-06-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health department vacant seats will be filled within 60 days jitendra awhad