मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात आठवडाभर उपोषण केल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे उपोषण मागे घेतल्यानंतर जालनातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता अनेकजण त्यांची भेट घेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना फोन केला होता. मनोज जरांगे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत आता स्वतःहून माहिती दिली आहे. आज त्यांनी रुग्णालयातूनच माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या माझी प्रकृती चांगली आहे. पण असं होतंय की एकदिवस तब्येत चांगली होतेय, एक दिवस हसू येतंय आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी दुखतंय त्यामुळे चेहऱ्यावरचं हसू जातंय. पण मराठा बांधवांनी काळजी करण्याचं कारण नाही. तब्येत एकदम ठणठणीत बरी झाली आहे.

“प्रकृती चांगली आहे. सगळे अहवाल चांगले आहेत. काल चेहऱ्यावर हसू होतं. पण आता अन्न पचन न होण्याचा त्रास होतोय. टोकाचं उपोषण झालेलं असतानाही डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार केले आणि ठणठणीत करून टाकलं मला”, असंही ते पुढे म्हणाले.

गावागावात शांततेत उपोषण करणार

“डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

कायदा-सुव्यवस्था राखा

“आपण बेमुदत उपोषण स्थगित केलं असलं तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असं कृत्य करायचं नाही”, असं आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केलं.

महाराष्ट्र दौरा करणार

“महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचं आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health is getting better but manoj jarange gave information about health sgk