Prakashrao Abitkar On Dinanath Mangeshkar Hospital : भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशा अभावी वेळेत उपचार न देण्यात आले नाही आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही घटना मन सुन्न करणारी असून चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

प्रकाश आबिटकर काय म्हणाले?

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्या पद्धतीने एका रुग्णाला अधिकचे पैसे भरले नाहीत म्हणून उपचाराला जो उशीर झाला आणि त्यामुळे मन सुन्न करणारी घटना पुण्यात घडली. या संपूर्ण घटनेची पुण्याचे आरोग्य उपसंचालक आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून रुग्णालयाचे आणि त्या कुटुंबाचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल आणि त्यानुसार अहवाल समोर येईल. त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत आहे. यामध्ये शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळत असतो. तरी देखील अशा प्रकारे पैशाची मागणी रुग्णालय करु शकतं का? याची देखील चौकशी होईल. त्यानंतर जे चुकीचं असेल त्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं आहे.

रुग्णालयाने काय प्रतिक्रया दिली?

दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना सदर प्रकरणाची चौकशी रुग्णालयाकडून केली जाणार असल्याचे सांगितले. “सदर प्रकरणात जी माहिती समोर आली आहे, ती दीशाभूल करणारी आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही सर्व ती माहिती देणार आहोत”, असे रवी पालेकर म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या या घटनेवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मला या प्रकरणावर काही भाष्य करण्याआधी या घटनेचा अहवाल माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आमच्याकडे सिव्हील सर्जन यांचा अहवाल आला की त्या अहवालानुसार नेमकं काय झालं होतं? हे स्पष्ट होईल. संबंधित रुग्णालयाची प्रतिक्रियाही समोर येईल. त्यानंतर या घटनेत कोणाची चूक होती? या संदर्भातील निष्कर्षापर्यंत जाता येईल, त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.