महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विविध विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळालेल्या राज्यातील एकूण ४० विद्यार्थ्यांना मंगळवारी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
वैद्यकीय विद्याशाखेचे १०, दंत शाखेचे तीन, आयुर्वेद व युनानी शाखेचे सहा, होमिओपॅथी शाखेच्या पाच आणि इतर १६ शाखांतील विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक मिळविणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या वेळी कुलगुरू डॉ. जामकर यांनी समाजाच्या आरोग्याचे उत्तरदायित्व डॉक्टरांच्या हातात असल्याने सर्वसामान्यांना अत्याधुनिक उपचार सेवा मिळावी म्हणून भावी डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायाबरोबर वैद्यकीय सेवेचेही व्रत जोपासावे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये वैद्यकीय सेवा महाग होत असून गरिबांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी भावी डॉक्टरांनी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे देण्यात आलेले सुवर्णपदक ही ठरावीक महाविद्यालयांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील विविध आरोग्य विद्याशाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी पटकाविली आहेत.
यामुळे संपूर्ण राज्यभर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा एकसमान होत असल्याबद्दल विद्यापीठाचे ध्येय साध्य होत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना समाजासाठी आवश्यक संशोधनवृत्ती बाळगून समाजकार्यासाठी वाहून घेण्याचा सल्ला दिला. कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत नेऊन आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्निल तोरणे यांनी केले.
या वेळी कुलसचिव डॉ.आदिनाथ सूर्यकर, डॉ. किशोर तावरी, डॉ. मिलिंद देशपांडे, परीक्षा नियंत्रक डॉ. के. डी. गर्कळ हेही उपस्थित होते. आभार साहाय्यक कुलसचिव प्रमोद पाटील यांनी मानले.