मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आज (३० ऑक्टोबर) सहाव्या दिवशी जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत नांदेडच्या एक आरोग्य सेविका रेखा पाटीलही अंतरवाली सराटी येथे आल्या. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. तसेच आपण स्वतः आरोग्यसेविका असल्याचं नमूद करत तातडीने जरांगेंवर काय उपचार केले पाहिजे यावर प्रतिक्रिया दिली. हे बोलताना त्या भावनिक झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.
आंदोलक आरोग्यसेविका म्हणाल्या, “मी स्वतः आरोग्यसेविका आहे. मी खूप गंभीर परिस्थितीतील रुग्ण हाताळले आहेत. मी आरोग्य विभागात काम करते. मलाही रुग्णांच्या परिस्थितीचा अनुभव आहे. मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचं आरोग्य पाहून मला अक्षरशः झोप येत नाही.”
“मुलीच्या डोळ्यांची बुबुळं पांढरे झाले होते, पण इकडं माझा भाऊ…”
“परवा माझी मुलगी अचानक बेशुद्ध झाली. तिला मी घरी प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात नेले. तिच्या डोळ्यांची बुबुळं पांढरे झाले होते. पण इकडं माझा भाऊ मरायला लागला आहे. म्हणून मी मुलीवर उपचार करून लगेच इकडे आले,” अशी माहिती आरोग्यसेविका रेखा पाटील यांनी दिली.
हेही वाचा : उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचे हात थरथरले; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्याबरोबरच्या…”
“आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी याचे पुरावे हवेत का?”
“सरकारची लक्षणं मराठा समाजाला आरक्षण देण्याची नसून मनोज जरांगेंचा जीव घेण्याची आहेत. यांना पुरावे पाहिजे होते, आम्ही १५ हजार पुरावे दिले. आता यांना आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी आहोत याचे पुरावे हवे आहेत का?” असा प्रश्न रेखा पाटील यांनी सरकारला विचारला.
“तर मनोज जरांगेंना तात्काळ ऑक्सिजनची गरज”
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने आता तातडीने त्यांच्यावर काय उपचार व्हायला हवेत यावर बोलताना रेखा पाटील म्हणाल्या, “त्यांना आत्ता तातडीने आयव्ही फ्लुएड देणं गरजेचं आहे. त्यांना मल्टिव्हिटॅमिनही देणं आवश्यक आहे. त्यांचा एसपीओटू किती झालेला आहे हे आपण तात्काळ बघणं आवश्यक आहे. एसपीओटू कमी झाला असेल तर त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज आहे.”
हेही वाचा : “गड्यांनो मला माफ करा, मी…”; क्षीण आवाजात मनोज जरांगे यांचं वक्तव्य, म्हणाले…
“त्यांची एक एक पेशी मरत आहे”
“येथील डॉक्टरांनी मनोज जरांगेंची साधी काळजीही घेतलेली नाही. ते पूर्ण डिहायड्रेट झाले आहेत. त्यांची एक एक पेशी मरत आहे,” असंही रेखा पाटील यांनी नमूद केलं.