संदीप आचार्य
काही वर्षांपूर्वी साठी- पन्नाशीत येणाऱ्या हृदयविकाराचा झटका आता ३०-४० वर्ष वयोगटातील तरुणांमध्येही सर्रास दिसून येत आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डियोजी द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार,चाळीशीच्या आतील तरूणांना अचानक हृदय विकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात १३ टक्के वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव ही यामागील मुख्य कारण आहेत.
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, हायपर कोलेस्ट्रॉल, अनुवांशिकता यांसारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना कोरोनरी हार्ट डिसीज हा विकार होण्याची शक्यता सर्वांधिक असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जागतिक स्तरावर, विशेषत: तरुण पिढीतील १७.९ दशलक्ष लोकांचे मृत्यू हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाशी संबंधित असून यापैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होतात.
लिलावती रूग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विद्या सुरतकल म्हणाल्या की, हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. छातीत अचानक वेदना जाणवण, मळमळ, चक्कर येणं, दम लागणं, श्वास घेताना अडचणी येणे, छाती भरून येणं, हात-पाय गार पडणं ही लक्षणं आहेत. परंतु, सध्या तरूणांमध्ये अचानक हृदय विकारचा झटका येण्याचं प्रमाण वाढल आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातील तरूणांमध्ये कोरोनरी हार्ट डिसीजचं प्रमाण १२ ते १६ टक्के झाले आहे. यामागे धूम्रपान, प्रोटीन सप्लिमेंट, स्नायूंच्या वाढीसाठी अंनाबॉलिक स्टिरॉइड्स यांसारख्या औषधांचे सेवन, संप्रेरक इंजेक्शमुळे रक्तवाहिन्यात गुठळ्या तयार होणे यातून ह्रदयविकाराचा झटका येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचप्रमाणे वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, अपुरी झोप, निर्जलीकरण, जंक फुडचे सेवन या सर्व गोष्टी हृदयविकाराला कारक आहेत.
आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० टक्के हृदय विकाराचे रुग्ण हे ४० ते ४५ वयोगटातील असतात याशिवाय तिशीच्या आतील रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक म्हणावे एवढे असल्याचे क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलचे संचालक डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले. पंचवीस तीशीतील तरुणांमध्ये धुम्रपान, मद्यसेवन करण्याचे प्रमाण तसेच तणावपूर्ण जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वेळा व सवयी या हृदयविकाराला प्रामुख्याने अमंत्रण देताना दिसतात. हा तरुण वर्ग बटर-बर्गर संस्कृतीच्या पूर्ण अहारी गेला असून व्यायामाशी यांचा संबंध दिसत नाही. रात्रीचे काम तसेच तणावाखालील जीवन याच्यामुळे तरुणवर्गात हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. रत्नपारखी म्हणाले.
हृदयविकार तज्ज्ञ डॉ निकेश जैन म्हणाले की, आता २५ ते ४५ वर्ष वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असून तरूणांमध्ये अतितणाव हे यामागील मुख्य कारण आहे. माझ्या पाहाण्यात तरुणांमध्ये मधुमेहाचे व रक्तदाबाचे प्रमाण वाढत असून यातूनही हृदयविकाराचा त्रास उद्भवताना दिसून येतो.
केईएमच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन यांच्या म्हणण्यानुसार बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी आदींमुळे तरुणांमध्ये हृद्यविकाराचे प्रमाण वाढताना दिसते. केईएममध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चाळीशीच्या आतील रुग्ण येताना दिसतात. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारविहारातील नियमितता, व्यायाम तसेच धुम्रपान व दारुपासून लांब राहाणे, पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. २०११ ते २०२२ या काळात हृदयविकाराच्या प्रमाणात पाचपट वाढ झाल्याचे दिसून येते. ४० ते ५० वयोगटातील हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये ३३ टक्के वाढ झाली असून तीशीच्या आतील तरुणांमध्ये हृदयविकाराचा त्रास वाढत असल्याचे दिसून येते. या तरुणांमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण लाक्षणीय आहे. संतुलीत आहार, पुरेशी झोप तसेच योग्य व्यायाम आणि व्यसनांपासून तरुणांनी दूर राहाणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ अजय महाजन यांनी सांगितले.