पाकिस्तानहून तब्बल २५०० किलोमीटरचा प्रवास करून तो आला होता! फक्त एका हृदयाच्या शोधात! अखेर बऱ्याच खडतर परिस्थितीतून गेल्यावर त्याला ते मिळाले. आता त्याला मायदेशची ओढ लागलीय. त्याच्याकडे आता भविष्याची स्वप्ने आणि छातीत धडधडणारे एक ‘भारतीय’ हृदयही!  
पाकिस्तानच्या मौलाना महम्मद झुबेर आझमी (वय – ४०) यांच्यावर चेन्नईत अत्यंत गुंतागुंतीची समजली जाणारी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. झुबेर यांच्या हृदयाचे कार्य लक्षणीयरीत्या मंदावले होते. त्यातच त्यांना ‘हिपेटायटिस सी’ चा संसर्ग झाल्यामुळे या शस्त्रक्रियेत विशेष जोखीम होती. झुबेर यांचा रक्तगट आणि हृदयदात्याचा रक्तगटही वेगळा होता. ही जोखीम उचलली चेन्नईचे हृदयशल्यचिकित्सक डॉ. के. आर. बालकृष्णन आणि त्यांच्या टीमने. येथील ‘फोर्टसि मालार’ रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. एका अपघातात मेंदू मृत झालेल्या भारतीय व्यक्तीचे हृदय झुबेर यांच्यासाठी वापरण्यात आले. ही व्यक्ती ३७ वर्षांची होती. झुबेर यांचा रक्तगट ‘एबी +’ तर हृदयदात्याचा रक्तगट ‘ओ +’ होता.  
डॉ. बालकृष्णन म्हणाले, ‘‘पाकिस्तानातील रुग्णालयांत हृदय प्रत्यारोपणाची सोय नसल्यामुळे लाहोर येथील डॉक्टरांनी झुबेर यांच्या शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली. या शस्त्रक्रियेत अनेक आव्हाने होती. झुबेर यांची शारीरिक अवस्था वाईट होती. त्यांच्या हृदयाची आकुंचन-प्रसरण क्रिया केवळ १५ टक्के इतकीच होत होती.
मूत्रिपडांचे कार्यही जवळजवळ बंद झाले होते. त्यांचा आणि हृदयदात्याचा रक्तगट वेगळा असल्यामुळे असे हृदय शरीराकडून नाकारले जाण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून रुग्णाला प्रतिकारशक्ती कमी करणारी ‘इम्युनोसप्रेसिव्ह’ औषधे दिली जातात. या औषधांचा यकृत आणि मूत्रिपडावर परिणाम होऊ शकतो. आता त्यांची प्रकृती चांगली असून अजून एक महिन्याने त्यांना मायदेशी परत जाता येईल.’’
झुबेर यांचे मेव्हणे जमाल उर रेहमान म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील माणसांमध्ये फरक नाही. आम्हाला इथे परके वाटत नाही. मात्र दोन्ही देशांदरम्यानची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ होणे आवश्यक आहे.’

चेन्नई आघाडीवर
हृदय प्रत्यारोपणात चेन्नईच आघाडीवर आहे. देशात आतापर्यंत सुमारे १०० हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यातील ९५ टक्के शस्त्रक्रिया चेन्नईतच झाल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र अजून एकही हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेले नसल्याचे डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले. मृत व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढून घेतल्यावर त्याचा वापर दुसऱ्या रुग्णासाठी पाच तासांच्या आत होणे आवश्यक असते. यामुळे अनेकदा दाता उपलब्ध असूनही प्रत्यारोपणासाठी त्याच्या हृदयाचा उपयोग करून घेणे शक्य होत नाही. मृत शरीरातील हृदय १२ तासांपर्यंत टिकवता यावे यासाठी ते बाहेरही धडधडते ठेवले जाते.