सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी दिव्यांंगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे कायदेशीर बंधन असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्मशानभूमीत सुरू असलेल्या चक्री उपोषणात कुटुंबीयांसह सहभागी झालेल्या एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाला दिव्यांग विकास निधीचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यातूनच चाललेला आंदोलनात बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रकार उजेड आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृत मुलावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका चिखर्डेकरांनी घेतली आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम व बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने हे चिखर्डे गावात दाखल होऊन आंदोलक गावक-यांशी संवाद साधत आहेत. परंतु सायंकाळपर्यंत या आंदोलनाची कोंडी कायम होती. संभव रामचंद्र कुरूळे असे मृत दिव्यांग मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशासन हादरले आहे.
चिखर्डे गावात राहणारे रामचंद्र कुरूळे यांची दोन्ही मुले दिव्यांग होती. ग्रामपंचायतीकडून दिव्यांग कल्याण निधीसाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी कुरूळे कुटुंबीयांसह काही गावकरी मंडळींनी १५ आॕगस्टपासून ग्रामपंचायतीसमोर चक्री उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने हे आंदोलन बेदखल केले असतानाच पुढे थोड्याच दिवसांत रामचंद्र कुरूळे यांची दिव्यांग मुलगी वैष्णवी (वय १३) हिचा आंदोलनस्थळीच मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासन जागे होऊन दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध होण्यासाठी बैठका घेतल्या. परंतु कायदेशीर अडचणींमुळे मूळ प्रश्न तसाच प्रलंबित राहिला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुरूळे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. परंतु मृत वैष्णवीच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी झाली नव्हती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अपघाती मृत्यू प्रकरणात आर्थिक मदत मिळू शकते, कुरूळे कुटुंबीयांसाठी ही तांत्रिक अडचण ठरली.
हेही वाचा… रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यू पश्चात कुरूळे कुटुंबीयांसह गावक-यांनी पुन्हा गावातील स्मशानभूमीत चक्री उपोषण सुरू केले. या आंदोलनात कुरूळे यांचा दुसरा दिव्यांग मुलगा संभव यानेही सहभाग घेतला होता. परंतु आंदोलनस्थळी रात्रीच्या गारठ्यामुळे संभवची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तात्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखर्डे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध होत नसल्याने चिखर्डे गावात चाललेल्या आंदिलनात दिव्यांग बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू झाला तरीही प्रशासन ढिम्मच असल्याचा आरोप आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी गावात पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
चिखर्डे गावातील रामचंद्र कुरूळे यांची दिव्यांग असलेल्या दोन्ही मुलांची नोंद स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून मदत उपलब्ध होण्यास तांत्रिक अडचण आहे. संभव कुरूळे यास आंदोलनस्थळी नव्हे तर घरात त्रास सुरू होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीच्या मृत वैष्णवीच्या प्रकरणात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी पाठविलेला प्रस्तावही तांत्रिक अडचणीमुळे मंजूर होऊ शकला नाही. दिव्यांग कल्याण निधीसाठी अडचणी आहेत. तरीही यासंदर्भात जे जे आवश्यक आहे, त्याची पूर्तता होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. – शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर