गेल्या आठवडाभरापासून विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत असून नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती व गोंदिया हे जिल्हे होरपळून निघत आहेत. विदर्भात आठवडाभरात उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांत उष्माघाताने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे.
विदर्भात चंद्रपूर, नागपूर व वर्धा जिल्ह्य़ांत तापमान ४७ अंशाच्या पुढे नोंदविण्यात आले. तापमानाने शनिवारी नागपुरात ४७.३ अंश से. टप्पा गाठला असून गेल्या ११ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्यांसह पशुपक्ष्यांनाही उष्णतेचा फटका बसला आहे.
अमरावती जिल्ह्य़ात बापोरी येथील सुरेश संपत ठाकरे (५२) व देवगाव येथील कौशल्या मडावी (७५) यांचा उष्माघातााने मृत्यू झाला. तर बडनेरा व नवाते भागात दोन अनोळखी मृतदेह सापडले. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे.
शहरातील मेडिकल व मेयो रुग्णालयात उष्माघात आणि गॅस्ट्रोचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात सक्करदरा भागात गोदामाजवळ एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कॉटनमार्केट भागात एक ४० वर्षीय अनोळखी रिक्षाचालक रिक्षातच मृतावस्थेत आढळून आला. लकडगंज भागात वाहतूक पोलिसांच्या बूथजवळ ६० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. अजनीतील कुंजीलालपेठेत एक ६० वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. वर्धा मार्गावरील पांजरी येथे एका २८ वर्षीय तरुणाचा, विश्वकर्मानगरात एक, धरमपेठ खरे टाऊनमध्ये दोन आणि वाडीमध्ये एक मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरातील सीताबर्डी, गिट्टीखदान व नंदनवन भागात पाच अनोळखी मृतदेह सापडले. या सर्वाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा