आकाशात वाढलेली ढगांची गर्दी आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मराठवाडय़ासह राज्यभरात उष्म्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून शनिवारी औरंगाबादेत या मोसमातील सर्वाधिक ४०.४ अंश तापमान नोंदवण्यात आले. एकीकडे अवकाळी पावसाने होत असलेले पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे असह्य़ उकाडय़ाने होणारी अंगाची लाही लाही, असे विरोधाभासी चित्र मराठवाडय़ात निर्माण झाले आहे.
गेले काही दिवस दिवसाचे तापमान लक्षणीय वाढत असून, संध्याकाळी व रात्रीही उशिरापर्यंत तसेच सकाळीही गरम झळांनी नागरिक चांगलेच त्रासून गेले आहेत.  शनिवारचे कमाल तापमान ४०.४, तर किमान २५.५ अंश सेल्सिअस होते. अंग भाजून काढणाऱ्या उन्हामुळे  दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीय घटली आहे. लातूर, हिंगोलीसह मराठवाडय़ाच्या काही भागांत गेले काही दिवस अवकाळी पाऊस पडत असला, तरी औरंगाबादसह बहुतेक ठिकाणी दिवसा आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने उकाडय़ाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.
विजेचा लपंडाव
असह्य़ उकाडय़ाने हैराण करून सोडले असतानाच जीटीएलच्या कारभारानेही त्यात भर टाकली आहे. शहराच्या अनेक भागात तासन्तास वीज केव्हाही खंडित केली जात आहे. वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणारे जीटीएलचे सक्षम अधिकारी पुणे-मुंबईत राहतात. आठवडय़ातील चारपाच दिवसच तक्रारी ऐकल्या जातात. त्यातही जीटीएल टोलवाटोलवी करते, असे निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा विद्युतीकरण समितीच्या ८२ व्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी जीटीएलच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. वीजग्राहकांच्या समस्या ऐकण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांसह २४ तास अखंडित ग्राहक सेवा केंद्र सुरू ठेवण्याबाबत आदेश त्यांनी दिला.