रायगड जिल्ह्य़ात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसायला लागली आहे. जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.
केरळात दाखल झालेला मान्सून आता कोकण किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत असल्याचे दिसून येते आहे. मान्सूनला पोषक वातावरण सध्या किनारपट्टीवर पाहायला मिळते आहे. रायगड सलग दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी १९.३० मिलिमीटर पावसाने हजेरी लावली आहे. रोहा इथे ६२ मिलिमीटर, खालापूर इथे ३९ मिलिमीटर, तर तळा इथे ३८ मिलिमीटर तर माणगाव आणि सुधागड पाली इथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारीही बहुतांश सर्वच तालुक्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कोकणात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
मान्सूनपूर्व सरीमुळे जिल्ह्य़ातील बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पेरणीसाठी योग्य वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, येत्या चोवीस तासांत कोकण किनारपट्टीवर उत्तर भागांत काही ठिकाणी तर दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.