दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडय़ाच्या काही भागात मान्सून दाखल झाला असून, तो गुरुवारी सकाळी परभणीपर्यंत पोहोचला. याचबरोबर मध्य महाराष्ट्रात साताऱ्याच्या पुढे सरकून तो बारामतीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मान्सूनच्या या प्रगतीबरोबरच पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, फलटण-वाई, नाशिक, मराठवाडय़ात बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद अशा विस्तृत भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्य़ातील एका नदीला आलेल्या पुरात मोटार वाहून गेल्याने तीनजण मृत्युमुखी पडले, तर वीज कोसळून इतर दोघांचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद, बीड, परभणी, औरंगाबादेत गुरुवारी दिवसभरात पावसाच्या मोठय़ा सरी बरसल्या. बीडमध्ये विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद येथे वादळी पावसामुळे ५० हून अधिक झाडे उन्मळून पडली, तर अनेक घरांचे पत्रे उडाले. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, नाशिक या जिल्ह्य़ांमध्येही मुसळधार पाऊस नोंदवला गेला. नगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात रात्री व सकाळच्या मुसळधार पावसामुळे तेथील शिवडोह नदीला पूर आला. त्यात पारनेर-आळकुटी रस्त्यावर एक मोटार वाहून गेली. या घटनेत मोटारीतील सहाजणांपैकी तिघांचा मृत्यू झाला. याशिवाय सोनई गावाजवळ वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.
मान्सूनच्या पुढे सरकण्यास सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत तो आणखी सरकून पुणे व महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी दिली.