कोयना धरण क्षेत्रात पुरती दडी मारलेल्या परतीच्या पावसाने आज सायंकाळी ४ नंतर धरण पाणलोट क्षेत्रात धोधो कोसळने सुरू केले आहे. याचबरोबर धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे. चालू पावसाळय़ात कोयना धरण क्षेत्रासह धरणाखालील विभागात गतवर्षीच्या तुलनेत दीडपट तर, सरासरीच्या तुलनेत सव्वापट पाऊस कोसळल्याची नोंद आहे.
पहिल्या सत्रात समाधानकारक कोसळलेल्या पावसाने दुस-या सत्रात प्रदीर्घ उघडीप घेऊन शेतकरी वर्गाला चिंतेच्या खाईत लोटले. मात्र, परतीच्या पावसाने दुष्काळी पट्टय़ासह कृष्णा, कोयनाकाठाला झोडपून काढताना सततचे बरसने कायम ठेवले आहे. परिणामी दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यांसह नजीकच्या विभागात व कृष्णा, कोयनाकाठी समाधानाचे वातारण आहे.
कोयना धरण क्षेत्रातील नवजा विभागात सर्वाधिक ६,४०१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पाठोपाठ महाबळेश्वर विभागात ५,७१२ तर, कोयना विभागात ५,२३२ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे. धरणाची पाणीपातळी २,१६१ फुट ५ इंच असून, धरणाचा पाणीसाठा १०२.५४ टीएमसी म्हणजेच ९७.४३ टक्के आहे. यंदा धरणाच्या क्षमतेच्या दीडपट पाण्याची धरणामध्ये आवक झाली आहे. १५५.६६ टीएमसी पाणी धरणात आले असून, त्याची धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत १४७.९० टक्के नोंद आहे.
कोयना धरण क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी जोरदार पाऊस सुरू
कोयना धरण क्षेत्रात पुरती दडी मारलेल्या परतीच्या पावसाने आज सायंकाळी ४ नंतर धरण पाणलोट क्षेत्रात धोधो कोसळने सुरू केले आहे. याचबरोबर धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे.
First published on: 28-09-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain continuing in koyna dam and krishna