दुर्घटनाग्रस्त तळयेच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
अलिबाग : दरडींचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनाबरोबरच कोकणातील नद्यांना येणारे पूर आणि त्यामुळे निर्माण होणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेऊ न त्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दरडग्रस्त तळये गावातील परिस्थितीची पाहणी करून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुर्घटनांतून धडा घेण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेतले तर धोकादायक ठिकाणी असलेल्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागेल, त्यासाठी आराखडा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अतिवृष्टी झाल्यावर कोकणातील नद्यांना पूर येतो. पुरामुळे जनजीवन ठप्प होते. अतोनात नुकसान होते. हे लक्षात घेऊ न पुराच्या पाण्याचे नियोजन करावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्यात सहकार्य मिळत आहे. बचावकार्यात तटरक्षक दलासह, नौदल, हवाई दल आणि एनडीआरएफच्या पथकांची खूप मदत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

‘स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा गरजेची’

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटे पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी आणि कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील आपद्ग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत रोखीने देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  कोकणातील नैसर्गिक आपत्ती वाढत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर फडणवीस म्हणाले, या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. कोल्हापूर, सांगली भागांत पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा राज्य सरकारने तातडीने पावले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय ठेवला पाहिजे.

तळीयेचे पुनर्वसन ‘म्हाडा’ करणार

’दरड कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले महाड तालुक्यातील तळीये गावाचे पुनर्वसन म्हाडाच्या वतीने करण्यात येईल, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी जाहीर केले.

’दरड कोसळल्याने बाधित झालेले हे गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यावर सारे नियोजन करण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.

’गावाचे म्हाडाच्या वतीने पुनर्वसन करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.

हिरकणी वाडीतील ७८ जणांचे स्थलांतरण

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथील नागरिक सध्या दरडींच्या छायेखाली राहात आहेत. दोन दिवसांपासून गावात दरडी कोसळत आहेत. घरांनाही तडे गेले आहेत. हे लक्षात घेता १५ घरांमधील ७८ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पोलादपूरला दरड कोसळली

पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची येथे शनिवारी दरड कोसळली. तसेच अतिवृष्टीमुळे डोंगराला भेगाही पडल्या. या दुर्घटनेनंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने गावातील ९७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना नानेघोळ येथील प्रार्थना मंदिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.

Story img Loader