धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीकाठच्या परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील वाशी, कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यांत पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. इटकूर पाठोपाठ धाराशिव ग्रामीणमध्ये ९० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून पावसाची झड सुरू असल्यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी अनेकांची तारांबळ उडाली. तेरणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

शनिवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस सोमवारीही कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन तालुक्यांत पावसाची नोंद सर्वाधिक झाली आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यात कळंब तालुक्यात सर्वाधिक ९० मिलीमीटर तर त्यापाठोपाठ वाशी तालुक्यात ७२ आणि धाराशिव तालुक्यात ६२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. लोहारा तालुक्यात सर्वात कमी ३४ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर त्यानंतर उमरगा, तुळजापूर आणि परंडा या तिन्ही तालुक्यात 38 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भूम तालुक्यात मागील २४ तासात ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; चार जणांना अटक

या १६ मंडळात अतिवृष्टी

मागील २४ तासात जिल्ह्यातील १६ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक म्हणजेच अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. त्यात कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर आणि त्यापाठोपाठ कळंब शहर आणि परिसरात १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धाराशिव ग्रामीणमध्ये 86 तर जागजी मंडळात ७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. वाशी तालुक्यातील पारगाव मंडळात ६८.५० मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर धाराशिव शहर मंडळासह तालुक्यातील ढोकी, तेर, कळंब तालुक्यातील येरमाळा, मोहा, शिराढोण, गोविंदपूर, उमरगा तालुक्यातील डाळिंब, लोहारा तालुक्यातील माकणी, वाशी शहर आणि वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे अतिवृष्टी झाली आहे.

हे ही वाचा… मराठवाड्यात पावसाचा कहर; तीन ठार, ८० जनावरे वाहून गेली तर १३५ घरांची पडझड

तेरणा धरणातून मोठा विसर्ग

कळंब शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी शनिवारी रात्री, रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे तेरणा परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मागील आठवड्यात धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारे तेरणा धरण ओसंडून वाहू लागले होते. त्यात मागील दोन दिवसातील पावसामुळे तेरणा धरणातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी तेर गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक छोटेमोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. शेतकरी, वाहनचालक तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नुकसानीची माहिती तत्काळ नोंदवा : आमदार पाटील

धाराशिव तालुक्यातील तेरणा धरण परिसरातील गावांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी साठून खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु या नुकसानीची माहिती तत्काळ पीकविमा कंपनीस देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी त्वरीत विमा कंपनीस व प्रशासनाला नुकसानीची माहिती कळवावी, जेणेकरून आपण संरक्षित केलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळू शकेल, असे आवाहन भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.