अवकाळी पावसाच्या गारपिटीने सोमवारी दुपारी कोल्हापूर जिल्हय़ाच्या पश्चिम भागाला चांगलेच झोडपून काढले. तर शहर व परिसरात सुमारे तासभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांत पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर खासदार राजू शेट्टी यांनी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शासकीय पातळीवर तातडीने सर्वेक्षण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.    
गेल्या आठवडय़ाभरापासून शहरात उष्मा वाढीस लागला होता. पावसाळी वातावरण तयार झाल्याने कधीही पाऊस येईल, अशी चिन्हे दिसत होती. रविवारी जिल्हय़ाच्या काही भागांत तुरळक पाऊस झाला होता. सोमवारी दुपारी अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. शिरोळ तालुक्यात जबरदस्त गारपीट झाली. यामध्ये द्राक्षे, भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांत धुवाधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. इचलकरंजी शहरात तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. तुलनेने कोल्हापूर शहर व पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी होते. दुपारी साडेतीन वाजता पावसाला सुरुवात झाली. बराच काळ हलक्या सऱ्या कोसळत होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे पादचाऱ्यांची भलतीच पंचायत झाली.    
जयसिंगपूर शहरात सर्वात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली. दीड ते दोन इंचाच्या गारा कोसळत होत्या असा आपला अनुभव सांगून खासदार शेट्टी म्हणाले, दुपारी मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात कार्यक्रम सुरू असताना मोठय़ा गारा कोसळल्याने सभागृहाचा पत्रा फुटला होता. यावरून किती जबरदस्त प्रमाणात गारपीट झाली याचा अंदाज येतो. शेतकऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने तातडीने सर्वेक्षण हाती घेण्याची मागणी त्यांनी लोकसत्ताशी बोलताना केली.
 

Story img Loader