गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कालपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. रायगडच्या तळीये गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला असून सुतारवाडीमध्ये अशाच घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे पावसाचं जीवघेणं रूप सध्या कोकणात दिसून येत असताना पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये देखील परिस्थिती चिंताजनक असून तिथे बचावपथकं तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
२०१९ च्या पूरस्थितीची आठवण
२०१९मध्ये अशाच तुफान पावसामध्ये अलमट्टी धरणाचं पाणी सोडल्यामुळे कोल्हापूर, सांगली या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. कालपासून कोल्हापूरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर कोल्हापूरकरांना २०१९ साली निर्माण झालेल्या परिस्थितीची आठवण झाली. मात्र, यंदा आधीपासूनच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. “अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून हे प्रमाण अडीच लाख क्युसेक्स करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये एकीकडे पावसाचं पाणी साचत असताना धरणातून विसर्ग होत असल्यामुळे पाणी कमी देखील होत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोल्हापुरात अजून मोठा पाऊस झाला, तर परिस्थिती चिंताजनक होऊ शकते”, असं ते म्हणाले.
रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता
NDRF च्या दोन टीम तैनात
दरम्यान, कोल्हापूरमध्ये संभाव्य परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या असून तिसरी टीम पाठवण्यात आली असल्याची माहिती देखील विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याशिवाय, लष्कराची देखील एक टीम तिथे दाखल झाली असून तेथील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे, असं ते म्हणाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम योग्य त्या ठिकाणी पाठवल्या जात आहेत. कोल्हापूरला लष्कराची टीम हवाई मार्गाने पाठवत आहोत. पाऊस थांबलेला नाही. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे गावंच्या गावं वेढली गेली आहेत. त्यामुळे या कामात अडथळे येत आहेत, असं देखील वडेट्टीवार यांनी नमूद केलं आहे.