सांगली : मिरज तालुक्यातील तानंग गावच्या शिवारात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने ओढ्याला आलेल्या पुरातून लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती वाहून गेला. झाडावर अडकून बसलेल्या व्यक्तीची आयुष हेल्पलाईन पथकाने अडीच तासानंतर सुखरुप सुटका केली. ओढ्याला आलेल्या पुरामुळे मालगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
सायंकाळी तानंग, कळंबी, सोनी परिसरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी तानंग ओढा दुथडी भरुन वाहू लागल्याने रानात गेलेले शेतकरी, मजूर अडकून पडले. या लोकांना सुखरुप ओढा पार करण्यासाठी विजय कारंडे प्रयत्न करत होते. या प्रयत्नात पाण्यातील पायाखालचा दगड निसटल्याने कारंडे जोराच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. काही अंतरावर झाडाचा बुंधा हाती लागताच त्याच्या आधारे झाडावर बसले. दोन-अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आयुष बचाव पथकाने दोरीच्या मदतीने भ्रमणध्वनीच्या विजेरीच्या प्रकाशात बाहेर काढले.