रायगड जिल्ह्य़ाला मुसळधार पावसाने झोडपले असून जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागोठणे, आपटा, रोहा, शहरांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या ७२ तासांत जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन नदीकिनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्य़ात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक पावसाची नोंद पनवेल येथे झाली आहे. येथे १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल खालापूर येथे १६६ मिमी, माथेरान येथे १५६ मिमी, कर्जत येथे १५४ मिमी, पेण येथे १४० मिमी, माणगाव येथे १०८ मिमी, महाड येथे ७९ मिमी, पोलादपूर येथे ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
संतधार पावसाने जिल्ह्य़ातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठय़ात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २८ धरणांपैकी १९ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. तीन धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर सहा धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
दरम्यान अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे शहरातील सखल भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. शहरातील एसटी बस स्थानक, रिक्षा स्थानक, टेम्पो स्थानक, मच्छीमार्केट परिसरात दुपारी चारच्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पाली नागोठणे रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क खंडित झाला. रोहा नागोठणे पुलावर पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली.
मुसळधार पावसाने पनवेल आणि खोपोली शहरांतील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.