गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सरींनी सरासरी ओलांडली आहे. येत्या चोवीस तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील लांजा (१६२ मिमी), चिपळूण (१४२ मिमी), राजापूर (१०५ मिमी), खेड (९२ मिमी), दापोली (८१ मिमी), मंडणगड (७४ मिमी) आणि रत्नागिरी (५८ मिमी) तालुक्यांमध्येही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या जेमतेम तीन आठवडय़ांत जिल्ह्य़ाची पावसाची एकूण सरासरी १५७४ मिमी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाणे दीडपट आहे. जिल्ह्य़ात आजही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. विशेषत: राजापूर शहरात पुराचे पाणी घुसल्यामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली. कोदवली नदीच्या पाण्याने येथील अनेक दुकाने आणि टपऱ्या वेढल्या गेल्या आहेत. धामणी येथील पवार कुटुंबीयांच्या घराभोवती पाणी भरल्यामुळे अकरा जण अडकले. देवरुखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन सर्वाना सुरक्षित स्थळी हलवले. तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, पोलीस निरीक्षक मोहन पवार, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे इत्यादींनी तालुक्यात सर्वत्र मदतकार्यावर देखरेख ठेवली.
अलिबाग तालुक्यात ४७ मिमी, पेण तालुक्यात ३५ मिमी, मुरुड तालुक्यात २४२ मिमी, पनवेल तालुक्यात १२ मिमी, उरण तालुक्यात ७१ मिमी, कर्जत तालुक्यात ३७ मिमी, खालापूर ३६ मिमी, माणगाव इथे ५६ मिमी, रोहा इथे २१० मिमी, पाली इथे ८६ मिमी, तळा इथे २०२ मिमी, महाड इथे ४९ मिमी, पोलादपूर इथे ६७ मिमी, म्हसळा इथे ११८.४, श्रीवर्धन तालुक्यात ११६ मिमी, तर माथेरान इथे ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा शहरातील पाणी ओसरले असून इथे पंचनाम्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मुरुड, उरण, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांत सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. अजून २४ तास पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Story img Loader