सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाची संततधार आज सुरू होती. पण दिवसभर मुसळधार पाऊस नव्हता. मात्र या पावसामुळे करूळ घाटात दुपारी दरड कोसळली तो मार्ग काही तासांनंतर सुरू झाला, तर आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित झाले. आज सकाळी ८ वा. जिल्ह्य़ात सरासरी ६९.०८ मि.मी. एवढा पाऊस नोंदला गेला. जिल्ह्य़ात दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच होता, पण तो दिवसभर मुसळधार स्वरूपाचा नव्हता. एखादी पावसाची सर मुसळधार स्वरूपात कोसळत होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
जिल्ह्य़ात करूळ घाटात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली, पण ही दरड वेळीच हटविली गेल्याने कोल्हापूर-कणकवली मार्गातील करूळ घाटरस्ता सुरळीत झाला, असे जिल्हा नियंत्रण आपत्कालीन कक्षातून सांगण्यात आले.
आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबे प्रवाहित झाले. या धबधब्याच्या प्रवाहितपणामुळे आंबोलीचे पावसाळी पर्यटन उद्या शनिवार आणि रविवारी फुलणार आहे. पावसाळी पर्यटनासाठी आता गर्दी होईल. आंबोली घाटातही दरडीचे दगड कोसळत असल्याने ते भीतिदायक वाटते.
आंबोली घाटात पर्यटकांची गर्दी पाहता तसेच आंतरराज्य वाहतूक पाहता दरडीचे दगड कोसळणे भीतिदायक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र तत्परतेने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले.
जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत कोसळलेला पाऊस सकाळी ८ वाजता सरासरी ६९.०८ म्हणजेच ५५२.८० मि.मी. एवढा नोंदला आहे. तालुकानिहाय- दोडामार्ग ९७ मि.मी., सावंतवाडी ८३ मि.मी., वेंगुर्ले ८५ मि.मी., कुडाळ ५२ मि.मी., मालवण ६० मि.मी., कणकवली ८० मि.मी., देवगड ५३ मि.मी. व वैभववाडी ४२ मि.मी. एवढा नोंदला गेला आहे. या हंगामात सुरू झालेल्या पावसाने सातत्य ठेवले आहे. त्यामुळे कृषी विकासासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेगाने सुरुवात केली आहे. मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस पाहता जिल्ह्य़ातील गावाकडील लोकांनी चाकरमानी लोकांची विचारपूस करत दिवस घालविला. मुंबईकर चाकरमानी मोठय़ा प्रमाणात जिल्ह्य़ातील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा