सोलापूर : मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात दररोज पावसाच्या दमदारी सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ३०.१ मिलीमीटर पाऊस झाला असून माढा व बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर,  करमाळा आदी भागात पावसाचा जोर दिसून येतो. या पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहात आहेत. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्यावरील पुलावर वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात तिघेजण वाहून गेले. सुदैवाने त्यापैकी दोघे बचावले असून तिसरा तरूण बेपत्ता आहे. बार्शीजवळ ओढा वाहून गेल्यामुळे त्या भागातील संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये कुरनूर धरणात पाण्याचा प्रवाह येऊ लागल्याने तेथील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर शहरात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली असून २४ तासांत ५६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माढा-५८.२,  बार्शी-४६.१, उत्तर सोलापूर-४०.४, मोहोळ-३५.३, करमाळा-३४.७, दक्षिण सोलापूर-३२.७, पंढरपूर-२२.९, अक्कलकोट-२२.३, माळशिरस-१९, सांगोला-१६.३, मंगळवेढा-१३.३ याप्रमाणे तालुकानिहाय कमीजास्त पडलेल्या पावसाची आकडेवारी आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात सरासरी १८०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक ८५.८ मिमी पाऊस माढा तालुक्यातील रांझणी तर याच तालुक्यातील  दारफळ या मंडळात ८४. ५ मिमी पाऊस बरसला. याच तालुक्यात कुर्डूवाडीत ७९.५, तर म्हैसगाव मंडळात ६३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोर्टी (करमाळा) व सुर्डी (बार्शी) येथे प्रत्येकी ७२ तर खांडवी (बार्शी) मंडळात ६९ मिमी पाऊस बरसला. दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणीत ५६.८ तर मुस्ती येथे ५२ मिमी पाऊस झाला. मार्डी (उत्तर सोलापूर)-५७, करकंब (पंढरपूर)-५२, शेटफळ-५२, नरखेड-४७ (ता. मोहोळ) आदी मंडळांमध्ये पावसाचा विशेष जोर होता.

हेही वाचा >>>“निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं आणि..”, सुनील तटकरेंचं वक्तव्य

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४८८.८३ मिमी आहे. मागील पाच वर्षातील वार्षिक पर्जन्यमानाची स्थिती पाहता २०१९ साली ३३२.६२, २०२० साली ५४४.३२, २०२१ साली ५४१.७०, २०२२ साली ५२६.६ आणि मागील २०२३ साली ३६८.३८ वार्षिक पर्जन्यमानाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.

ओढ्यात तिघे वाहून गेले

सोलापूर शहर व जिल्ह्यात पडणा-या दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे रात्री धो धो पडलेल्या पावसामुळे औढ्यावरील पूल पाण्याखाली गेला. पुलावर पाण्याचा प्रवाह असताना दुचाकीवर बसून ओढ्यावरील पूल ओलांडताना  तिघे तरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सुदैवाने त्यातील बबन संदीपान जाधव आणि महेदेव रेड्डी हे दोघे बचावले. मात्र ज्ञानेश्वर संभाजी कदम हा बेपत्ता असून त्याचा शोध दुस-या दिवशी सायंकाळपर्यंत  लागला नव्हता. त्याची दुचाकी मात्र सापडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in solapur district has flooded rivers and streams amy
Show comments