सोलापूर : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.
यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बहुसंख्य गावे, वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाईमुळे जनतेची तहान भागविण्यासाठी २०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना तसेच पाण्याअभावी धोक्यात आलेल्या केळी, डाळींब, पेरू आदी फळबागांसह उन्हाळी पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणही तळ गाठत असल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही चिंता निर्माण झाली असताना सुदैवाने यंदा चालू जूनपासून पाऊस सुरू होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर रोहिणी नक्षत्राच्या पाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्याचा पूर्व अंदाज घेऊन जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रांत पिकांच्या पेरण्यांसाठी तयारी हाती घेतली आहे.
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. शेतांतही पाणी साचले असून ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. शुक्रवारी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने जोमदार हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. जिल्ह्यात सरासरी ३०.६ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक ६१.८ मिमी पाऊस करमाळा तालुक्यात बरसल्याने तेथे चैतन्याचे वातावरण दिसून आले. पंढरपुरातही ५३.६ मिमी पाऊस झाल्याने तेथे मोठी धांदल उडाली. माढा-४९.२, सांगोला-३६.२, माळशिरस-२८.६, मंगळवेढा-१९.१ आणि बार्शी-१९.१ याप्रमाणे बहुसंख्य तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्या तुलनेने उत्तर सोलापूर (८.३), दक्षिण सोलापूर (४.३) आणि अक्कलकोट (३.१) येथे कमी पाऊस झाला. आठवडाभर जिल्ह्यात सरासरी ६१.१ मिमी पाऊस झाला असून यात सर्वाधिक ११५ मिमी पाऊस करमाळ्यात पडला आहे.
टायर रिमोल्डिंग कारखान्यावर वीज कोसळून नुकसान
करमाळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असतानाच देवळाली गावात एका टायर रिमोल्डिंग कारखान्यावर वीज कोसळली. यात संपूर्ण कारखाना जळून गेल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सचिन अरूण कानगुडे यांच्या मालकीचा हा कारखाना करमाळा-जेऊर रस्त्यावर देवळाली येथे आहे. शुक्रवारी पहाटे पाऊस पडत असतानाच कारखान्यावर वीज कोसळली.