मुसळधार पावसाने कोकण परिसर व रायगड जिल्ह्य़ाला झोडपले असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६९.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्ह्य़ात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत अलिबाग ७९ मिमी, पेण ६५ मिमी, मुरुड १०५ मिमी, पनवेल २४ मिमी, उरण ६८ मिमी, कर्जत ५.२ मिमी, खालापूर २५ मिमी, माणगाव ७८ मिमी, रोहा ९४ मिमी, पाली ४७ मिमी, तळा १४२ मिमी, महाड ५१ मिमी, पोलादपूर ६७ मिमी, म्हसळा ६८.६, श्रीवर्धन तालुक्यात १३० मिमी, तर माथेरान येथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, सखल भागात पाणी साचणे यासारख्या घटना घडल्या  तर कुंडलिका, काळ, सावित्री नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
येत्या २४ तासांत उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २० घरांचे पूर्णत:, तर ५३८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यामुळे १८९ कुटुंब बाधित झाले आहेत. बाधित कुटुंबाना नुकसानभरपाई वाटप सुरू करण्यात आले आहे.

Story img Loader