सलग २४ तास झालेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातील २०० गावांचा संपर्क अद्याप तुटलेला असून ५०० गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. १५ मुख्य रस्ते बंद झाले आहेत. दिना, पर्लकोटा, कठाणी, खोब्रागडी व इंद्रावती नदीला पूर आल्याने भामरागड, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले असून १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, तर बल्लारपुरात घर कोसळून वृध्द महिलेचा मृत्यू झाला. अनेक घरांची पडझड झाली, तर दोन मोटारी व सिरोंचात १ जण पुरात वाहून गेला. चंद्रपुरात मुख्य मार्गावरील दुकाने व नदी काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जून, जुलै व ऑगस्ट अक्षरश: कोरडा गेल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन्ही जिल्ह्य़ात पावसाचे आगमन झाले. आजही तो सुरूच आहे. चंद्रपुरात शनिवारी दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सर्व प्रमुख रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी होते. मुख्य मार्गावरील दुकाने, स्टेट बॅंकेच्या मुख्य कार्यालयातही पाणी शिरले. बल्लारपुरात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे घर कोसळून वच्छल्ला मनसाराम लोखंडे या ७० वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राजुऱ्यात शेडको घर, मुख्य बाजार व शाळा-महाविद्यालयातही पाणी शिरले. झरपट व इरई या दोन्ही नद्यांमुळे हडस्ती व मार्डा रस्ता, पोंभूर्णा येथे जाणारे तिन्ही रस्ते, तसेच राजूरा, सास्ती, गोवरी, मूल, भेजगाव, माजरी, वणी रस्ता बंद होता. त्यामुळे २५ गावांचा संपर्क तुटला आहे.  गडचिरोली जिल्ह्य़ात तर दिना, पर्लकोटा, कठाणी, खोब्रागडी व इंद्रावती या प्रमुख नद्यांना पूर आल्याने भामरागड, एटापल्ली, अहेरी तालुक्यातील २०० गावांचा संपर्क अद्या तुटलेला आहे.
सर्वाधिक पाऊस चंद्रपुरात
गेल्या २४ तासात सर्वाधिक २३८.२ मि.मी. पावसाची नोंद चंद्रपुरात घेण्यात आली. बल्लारपूर १८०, गोंडपिंपरी १७८.२, पोंभूर्णा १८५, मूल १४१.८, सावली १२७.२, वरोरा ३५, भद्रावती ७०, चिमूर ३६, ब्रम्हपुरी ६६, सिंदेवाही ८५, नागभीड ३५.३, राजुरा २०७, कोरपना १४१. ४, जिवती ६३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. इरई धरण ८७ टक्के भरले आहे. सध्या धरणाची पातळी २०६.२९७ दलघमी असून २ दरवाजे उघडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा