सांगली : गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेला हस्ताचा पाऊस नवरात्रीच्या माळेत सापडला. यामुळे आता दहा दिवस पावसाचा मुक्काम असल्याच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदारांबरोबरच काढणीला आलेल्या खरीप पिकांचे काय होणार याची धास्ती लागली आहे. आज सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. हस्त नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले. मात्र, आजपासून नवरात्र सुरू झाल्याने हस्त नक्षत्राचा पाऊस नवरात्रीच्या माळेत सापडल्याची धारणा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहे. यामुळे दसरा संपेपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असल्याचे मानले जाते.
हेही वाचा >>> मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?
दरम्यान, काल सायंकाळी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे पावसाबरोबर गारपीटही झाली. या भागातील द्राक्ष बागांच्या काड्या व फुटलेले कोंब मोडले. गारांच्या माऱ्याने पाने फाटत त्याची चाळण झाली. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मका ही पिके जमीनदोस्त झाली. तासगाव तालुक्यातील लोढे, कौलगे, सावर्डे, चिंचणी, मनेराजुरी, खुजगाव, वाघापूर, आरवडे, बस्तवडे तुरची, राजापूर यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले. अर्ध्या तासात मणेराजुरी परिसरात ३६.५ मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसापूर्वी दहा मिनिटे गारांचा तडाखा बसला. या गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. डोळे फुगलेल्या व फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माऱ्याने मोडून पडले तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे.