रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी उशिरा जिल्ह्यात पडलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या वादळी पावसाचा कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला देखील फटका बसला आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्यातील वीज गायब झाली. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचेही नुकसान झाले. काढणीला आलेले भात शेतीचे पीक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वीजाच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. जिल्ह्यात पडलेल्या या वादळी पावसाचा भात शेतीला मोठा फटका बसला. तर या वादळी पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोर्चचे सुशोभिकरणासाठी पीओपीचे डिझायनिंग करण्याचे काम सुरु असताना पीओपी शीट्स धडाधड खाली पडल्या व आतील पातळ शीट लोंबकळू लागल्या. या पावसाने येथे होत असलेल्या निकृष्ट कामाची पोलखोल केली आहे.

हेही वाचा – दसऱ्याच्या दिवशी तुळजापूरमध्ये अग्रभागी असणाऱ्या माय मुहूर्ताब देवीच्या काठीचे तुळजापूरकडे प्रस्थान

हेही वाचा – Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

आचार संहिता लागायच्या आधी घाई गडबडीत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरणाचे काम राज्य शासनाच्या निधीमधून सुरू आहे. गेले काही महिने हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र काल रात्री झालेल्या वादळी पावसाने येथील निकृष्ट कामाची पोलखोलच केली आहे.
दरम्यान या घडलेल्या प्रकाराबाबत वीज पडल्याने हे झाल्याची काहींनी शक्यता व्यक्त केली. मात्र रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वीज पडली ही अफवा संपूर्ण रत्नागिरीभर पसरली. परंतु त्यानंतर येथे वीज पडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी उशिराने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडल्यामुळे बेसावध असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. मात्र या वादळी पावसामुळे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नियोजित कार्यक्रमांना देखीलफटका पडला. त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकळण्यात आले. तसेच लांजा तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथील रहिवाशी रवींद्र यशवंत मेस्त्री (वय ६५ निवसर आग्रेवाडी) यांच्या घरावर आंब्याचे भले मोठे झाड उन्मळून पडले. यावेळी घरावरील पत्र्याचे छत अंगावर पडल्याने घरातील घरमालक रवींद्र यशवंत मेस्त्री तसेच त्यांचा मुलगा राजेश रवींद्र मेस्त्री (वय ३०) असे दोघे गंभीर जखमी झाले होते. या जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या दोघांवर त्या ठिकाणी उपचार चालू होते. गंभीर जखमी झालेल्या रवींद्र मेस्त्री यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.