नीरज राऊत

पालघर तालुक्यासह डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये आज पहाटे साडेतीन वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणीच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पावसाचं रौद्ररुप पाहता एनडीआरएफची एक टीम पालघरला रवाना झाली आहे.

या पावसामुळे पालघर शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. मध्यरात्रीतून झालेल्या या मुसळधार पावसामुळे पालघर शहरात ४६०.६ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडीत झाला आहे. अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

बोईसर परिसरात नागरिकांचे मोठे नुकसान

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर, भीमनगर, रूपरजतनगर, सिडको कॉलोनी, टाइप १, २, ३ आणि ४, धोडीपूजा, अवधनगर इत्यादी सखल भागामधील तळ मजल्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी आल्याने खाण्यापिण्याच्या साहित्यासह अन्न धान्य व विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.

रात्रीपासून पावसाचा कहर चालू असून शहरातील विद्युत पुरवठाही बंद झाला आहे. पावसाच्या पाण्यात काही ठिकाणी विषारी साप व अन्य प्रकारचे प्राणी, किटक इत्यादी निघत असल्याचेही काही लोकांनी सांगितले आहे. रात्रभर आपला जीव मुठीत घेऊन हे नागरिक घरांमध्ये बसले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसून कोणी पाहणी करण्यासाठी आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.