गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात एकूण सरासरी ४५.१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर कोकणात सर्वत्र पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ातील रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त पावसाची (७०.८ मिमी) नोंद झाली असून त्या खालोखाल गुहागर (६१.४ मिमी), लांजा (६०.४ मिमी), संगमेश्वर (५९.८ मिमी), चिपळूण (४३ मिमी), राजापूर (३७.३ मिमी) आणि दापोली याही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडला. यंदाच्या मोसमात आजअखेर जिल्ह्य़ात एकूण सरासरी २३४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच रत्नागिरी तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये दोन हजार मिलीमीटर पावसाची सरासरी ओलांडली असून चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात २७०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आगामी ४८ तासांमध्येही पावसाचा जोर असाच कायम राहणार असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या या पावसामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी करणाऱ्यांची मात्र धावपळ होत आहे. मात्र बाजारपेठेतील उलाढालीवर फारसा परिणाम झालेला नाही. पण महामार्गावर वाहने सावधपणे चालवावी लागत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर आणखी ताण आला आहे.

Story img Loader