आंबोली हे दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते, परंतु अद्याप धबधबे प्रवाहित झालेले नसल्याने पर्यटकांना आनंद लुटता आला नाही. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने सुट्टीचा आनंद आंबोलीतील दाट धुक्यातच घालविला जाणार आहे.

आंबोलीत दुसरा व चौथा शनिवार-रविवारी पावसाळी पर्यटनासाठी प्रचंड गर्दी होती. आंबोली घाटातील आनंद लुटण्यासाठी सिंधुदुर्ग, गोवा राज्य, बेळगाव, कोल्हापूर तसेच राज्यातील भागातून पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असतात.

आज आंबोलीत पर्यटकांची गर्दी होती, पण धबधबे प्रवाहित झाले नसल्याने वर्षां पर्यटनाचा आनंद मात्र पर्यटकांना लुटता आला नाही. मात्र दाट धुक्यात रिमझिम कोसळणाऱ्या पावसात मात्र काही पर्यटकांनी मस्ती करून आनंद लुटला.

पावसाच्या लहरीमुळे यंदाचा पर्यटन हंगामदेखील लांबला आहे. आंबोलीत पावसाळी पर्यटन हंगामातच पर्यटक येतात. आंबोली, चौकुळ, गेळे या पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होते. हिरण्यकेशी तीर्थस्थानी भक्त मंडळी आवर्जून भेट देतात. आज आंबोली घाट व नांगरतास धबधबा आणि गेळे येथील कावळेसाद पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली होती.

आंबोलीत धबधब्यांची संख्या वाढविण्याचा विचार मध्यंतरी पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हा प्रशासन करत होते. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली, पण वनखात्याच्या गचाळ कारभारामुळे हे धबधबे पूर्णत्वास आले नसल्याचे सांगण्यात आले. या धबधब्यांव्यतिरिक्त वनखात्याची वनबाग तसेच महादेवगड पॉइंटदेखील आहेत. वनबाग मात्र वनखात्याच्या देखभालीची वाट पाहत आहे. वनखात्याच्या दुर्लक्षामुळेच वनबाग पर्यटकांना खुली नसल्याचे सांगण्यात आले.

आंबोली पावसाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज झाली असली तरी पावसाच्या लहरीपणामुळे पर्यटकांत मात्र नाराजी आहे. पर्यटकांना धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटता येत नाही.