सांगली : विजेच्या कडकडाटसह वाऱ्याविना गुरुवारी सायंकाळी सांगली-मिरज शहरात वळिवाच्या पावसाने झोडपले. दमदार पावसाने रस्ते जलमय झाले, तर नागरिकांची दैना उडाली.
दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर वीजेच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यंदाच्या उन्हाळी हंगामात पहिल्यांदाच मोठा पाऊस पडला. यामुळे सांगली शहरातील स्टेशन चौक, राजवाडा चौक, हरभट रोडसह मिरजेतील तांदूळ मार्केट, लोणी बाजार आदी सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला असून या पावसाने शिवार मोकार होण्यास मदत होणार आहे. नांगरटीच्या रानात पाणी खेळल्याने मेहनतीची औतकाम करण्यास चालना होणार आहे. पेरणीपूर्व मशागतीला गती देण्यास हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. आजच्या पावसावेळी जोरदार वारे नसल्याने केळी, द्राक्षाच्या तयार काड्या, ऊस यांची हानी फारशी झाली नाही.