चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात तीन ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली असून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धनगरवाडा येथे अवघ्या दोन तासात ढगफुटीसदृष्य पाउस होउन १६१ मिलीमीटरची नोंद झाली. चांदोली धरणात प्रति सेकंद १२ ते १३ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून सहा हजार ४०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, धरण परिसरासह सोमवारी ढगाळ हवामान असले तरी पावसाने उघडीप दिली आहे.
हेही वाचा >>> अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरण क्षेत्रात ८९ तर धनगरवाडा १६१ आणि निवाळी १३८ मिलीमीटर पाउस अवघ्या दोन तासात रविवारी झाला. यामुळे धरणात प्रतिसेकंद १२ ते १३ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणात पूर्ण क्षमतेने ३४.४० टीएमसी पाणीसाठा याअगोदरच झाला असल्याने धरणातून प्रतिसेकंद ६ हजार ४०० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वारणेचे पात्र दुथडी भरून वाहत असून कालपासून कोकरूड ते रेठरे पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी कास पठार हाऊसफुल्ल
धनगरवाडा, निवाळी, मणदूर आदी भागात पावसाने ओढे नाले दुथडी भरून वाहत असून पाणी बाजूच्या शेतात शिरल्याने शेतातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम भागाबरोबरच आटपाडी, दिघंची परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. आटपाडीमध्ये गेल्या २४ तासात ८३.८ आणि दिघंची येथे ६५.३ मिलीमीटर पाउस नोंदला गेला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २३.४ मि. मी. पाऊस झाला असून आटपाडी तालुकयात सर्वाधिक ६२.२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाउस पुढीलप्रमाणे. मिरज १३.२, जत ८, खानापूर-विटा – ३१.३ , वाळवा-इस्लामपूर २५.६, तासगाव २३.९, शिराळा ३१.६, आटपाडी – ६२.२, कवठेमहांकाळ – २१.८, पलूस १६.१ आणि कडेगाव – ३६.६ मिलीमीटर.