सांगली : गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी पुनरागमन झाले असून दुपारपासून सांगली, मिरज शहरासह विविध भागात दमदार पाऊस झाला. मात्र, पश्चिम भागातील चांदोली, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असून कोयनेचा २८ टक्के तर चांदोलीचा पाणीसाठा ४६ टक्क्यावर पोहचला आहे. कोकरूड रेठरेबंधारा पाण्याखाली गेल्याने शिराळा शाहूवाडी मार्ग बंद झाला आहे.
जूनच्या मध्यापर्यंत समाधानकारक पाउस झाल्यानंतर दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांची अवस्था कठीण बनली होती. मात्र, रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जत, कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके उन्हाने करपू लागली आहेत. जत मध्ये पाउस अद्याप समाधानकारक नसला तरी हवा बदलल्याने खरीप पिकांची अवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा…सांगली : ‘अंडी दर’ रोज सकाळी जाहीर करण्याचा निर्णय
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र, समाधानकारक पाउस असून भात पिकाची वाढ गतीने होत आहे. वारणा नदीच्या खोर्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदीपात्रातील पाणी वाढत आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक वाढत असून रविवारी सकाळी धरणातील पाणी पातळी ६०४.५० मीटर झाली आहे. ३२.४० क्षमतेच्या या धरणामध्ये १५.८५ टीएमसी पाणी साठा झाला असून येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के भरेल असा अंदाज आहे. तर कोयना धरणात २९.२८ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण २८ टक्के भरले आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात चांदोली येथे ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना येथे १०४ आणि पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे ६० तर नवजा येथे १०४ मिलीमीटर पाउस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
चांदोली धरणातून ६७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून वारणेच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाउस सुरू असल्याने वारणेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५९.४० टीएमसी झाला असून धरण ४८ टक्के भरले आहे अशी माहिती सांगलीच्या पूरनियंत्रण कक्षातून देण्यात आली.